नवी दिल्ली : नव्या सरकारच्या स्थापनेत प्रादेशिक पक्षांचा खरोखरच मोठा वाटा असेल की भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात,रालोआमध्येही शिवसेना, अकाली दल, अपना दल अण्णा द्रमुक, जनता दल (यू) असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेतच. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची मदत भाजपला लागेलच.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव प्रादेशिक पक्षांची वेगळी आघाडी करू पाहत आहेत, तर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेसच्या पाठिशी अनेक प्रादेशिक पक्षांची ताकद उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यासाठी तृणमूल, द्रमुक, बिजू जनता दल अशा अनेक पक्षांच्या ते सातत्याने संपर्कात आहेत.पण प्रामुख्याने चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती, जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हे पक्ष काय भूमिका घेणार आणि त्यांच्या भूमिकेची सरकार स्थापनेत गरज भासणार का, हा खरा प्रश्न आहे. हे तिन्ही पक्ष बिगरभाजप व बिगर काँग्रेस आघाडी वा तटस्थतेची भाषा करीत आहेत.
काही प्रादेशिक पक्ष आताच भाजप, तर काही काँग्रेसबरोबर आहेत. त्यामुळे भाजप वा काँग्रेसच्या आघाडीला बहुमत न मिळाल्यास या तीन प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरतील, पण त्या बदल्यात ते काय मागतात, हे महत्त्वाचे असेल.प्रादेशिक पक्षांना ११५ जागांचा अंदाजकाँग्रेस व भाजपच्या आघाडीत नसलेल्या पक्षांना मिळून ११५ पर्यंत जागा मिळतील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. हा आकडा मोठा असून, त्यात आम आदमी पक्ष, टीआरएस, तृणमूल सप, बसप आघाडी, बिजद यांचा समावेश आहे. त्यातील काही पक्षांची काँग्रेसला पाठिंबा देण्याची आताच तयारी आहे.