हैदराबाद : केंद्रामध्ये काँग्रेस व भाजपला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची सोमवारी भेट घेतली. केसीआर द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची चेन्नई येथे १३ मे रोजी भेट घेणार आहेत. तसेच ते कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनाही भेटणार आहेत.केरळमध्ये माकपच्या नेतृत्वाखाली डाव्या पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. केसीआर यांच्यासोबत जायचे की नाही याबाबत डावे पक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. कुमारस्वामी यांनी केसीआर यांच्याशी दूरध्वनीवरून प्राथमिक चर्चा केली आहे.लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी जाहीर होईल. त्यात ज्या पक्षाला बहुमत मिळेल किंवा जो पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल तो केंद्रात सरकार स्थापनेचा दावा करेल. अशा स्थितीत प्रादेशिक पक्षांच्या आघाडीद्वारे आपला दबाव गट तयार करण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेल्या विजयानंतर केसीआर यांना राष्ट्रीय राजकारणातही दबाव गट निर्माण करण्याचे ठरवले आहे. (वृत्तसंस्था)प्रादेशिक पक्षांना १२० जागा?केसीआर यांच्या कन्या व व निजामाबादच्या खासदार के. कविता यांनी सांगितले की, भाजप, काँग्रेसशी आघाडी न केलेले प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकांत १२० हून अधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रामध्ये सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल. अशा पक्षांशी तेलंगणा राष्ट्र समिती संपर्कात आहे.
प्रादेशिक पक्षांची आघाडी; केसीआर पुन्हा सक्रिय, स्टॅलिन, कुमारस्वामींची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:48 AM