अब की बार, प्रादेशिक पक्षांवर मदार; 'हे' पक्ष किंगमेकर ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 09:46 AM2019-03-21T09:46:35+5:302019-03-21T10:03:45+5:30

लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्ष बजावणार महत्त्वाची भूमिका

Regional Parties to play crucial Role In Lok Sabha Election | अब की बार, प्रादेशिक पक्षांवर मदार; 'हे' पक्ष किंगमेकर ठरणार?

अब की बार, प्रादेशिक पक्षांवर मदार; 'हे' पक्ष किंगमेकर ठरणार?

Next

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय धुळवूड रंगात आली आहे. सत्तेचे रंग नेमके कोणाच्या नशिबी येणार, याचा फैसला दोन महिन्यात होणार आहे. मात्र यंदा राष्ट्रीय पक्षांच्या सत्तेच्या स्वप्नात रंग भरण्यात प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रादेशिक पक्षांचा दबदबा वाढला आहे. त्यामुळे यंदा भाजपा, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना सत्तेचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरू शकतात. 

2014 मध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. तब्बल दोन दशकांनंतर जनतेनं एका पक्षाला स्पष्ट कौल दिला. भाजपानं बहुमताचा आकडा पार केला. त्यांना 282 जागा मिळाल्या. भाजपानं मित्रपक्षांसह सत्ता स्थापन केली. मित्रपक्षांमुळे एनडीएचं संख्याबळ 336 वर पोहोचलं. मात्र यंदा निवडणुकीपूर्वी आलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड आहे. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये एनडीएमधील काही घटक पक्षांनी साथ सोडल्यानं यंदा प्रादेशिक पक्षांची चांदी होऊ शकते. 

उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपानं 80 पैकी 71 जागा मिळवल्या होत्या. मात्र यंदा समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीनं आघाडी करत भाजपासमोर आव्हान उभं केलं आहे. बिहारमध्ये तर जवळपास संपूर्ण राजकीय परिघ प्रादेशिक पक्षांनी व्यापून टाकला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधात असलेला संयुक्त जनता दल आता भाजपासोबत आहे. संयुक्त जनता दलाचे जास्त आमदार असल्यानं त्या जोरावर त्यांनी अधिक जागा मागितल्या. विरोधकांच्या महाआघाडीचा सामना करण्यासाठी भाजपाला संयुक्त जनता दलाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. त्यासाठी भाजपाला आपल्या विद्यमान खासदारांची तिकीटं कापावी लागणार आहेत. 

महाराष्ट्रातही शिवसेनेनं भाजपाला जेरीस आणलं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सामना करण्यासाठी भाजपानं शिवसेनेसोबत युती केली. शिवसेनेनं गेल्या चार वर्षांपासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. युतीनंतरही शिवसेनेचा मोदीविरोध कायम आहे. निवडणुकीनंतर एनडीए पंतप्रधान ठरवेल, असं विधान काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यंदा चांगलं यश मिळण्याचा अंदाज आहे. मात्र तिथे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील. निवडणुकीनंतर त्यांची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ईशान्य भारतात भाजपानं अनेक लहान पक्षांसोबत आघाड्या केल्या आहेत. तमिळनाडूतही प्रादेशिक पक्षांभोवती निवडणूक फिरेल. ओदिशात बिजू जनता दल आणि तेलंगणात टीआरएसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर काय करणार, याची उत्सुकता आहे. कर्नाटकात जेडीएस काँग्रेससोबत सत्तेत आहे. हे दोन्ही पक्ष भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र निवडणुकीनंतर जेडीएसची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 

Web Title: Regional Parties to play crucial Role In Lok Sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.