पंकज रोडेकर, ठाणेविधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही जागावाटपाच्या ताणाताणीमुळे प्रचाराच्या रणधुमाळीला अजून वेग आलेला नाही. प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) शुल्क भरून करावी लागते. ठाण्याच्या आरटीओमध्ये अशा अवघ्या १५ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून यामध्ये १३ वाहने एकट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहेत. ठाणे शहरातील एकाही उमेदवाराने अथवा त्यांच्या पक्षाने ठाणे आरटीओकडे एकाही वाहनाची अद्याप नोंदणी केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत प्रचारासाठी मनसेने १३ वाहनांच्या नोंदणीचे शुल्क भरले आहे. भारतीय जनता पार्टीचे तारासिंग यांनी एक आणि एका अपक्ष उमेदवाराने अशा १५ वाहनांची नोंदणी झाली आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आम आदमी यांच्याकडून एकाही वाहनाची नोंदणी झालेली नाही. आरटीओत नोंदणी झालेली वाहने नाशिक, कल्याण आणि मुंबईतील आहेत. वाहनांवर जाहिरात करायची असेल तर आरटीओची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी देताना मालकी, संपूर्ण कागदपत्रे (आरसी बुक, विमा), चालकाचा परवाना, वाहनाची स्थिती आदींच्या छाननीनंतर नोंदणी केली जाते. ही परवानगी फक्त टी (टुरिस्ट) परवानाधारक वाहनांनाच मिळत असून परमिटसाठी त्यांना दोन हजार रुपये फी द्यावी लागणार आहे. ही फी भरल्यानंतर त्या वाहनांचा वापर वर्षभर प्रचारासाठी करता येणार आहे. म्हणजे याच नोंदणी शुल्कात त्याच वाहनाची विधानसभेच्या प्रचारासाठीही नोंदणी करणे शक्य होणार आहे. मात्र, जाहिरात करताना प्रचार साहित्य असे लावावे की, वाहनचालकाला त्याचा अडथळा नसावा. वाहतुकीलाही अडथळा होणार नाही, याची काळजी घेऊनच त्यावर हे साहित्य लावण्याची सूचना देण्यात येत असते.
आरटीओत १५ प्रचार वाहनांची नोंदणी
By admin | Published: September 26, 2014 1:58 AM