मये : सध्या मयेवासियांना दररोज विजेविना दिवस काढावे लागत आहेत. वीज समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. डोंगराळ आणि शेतीच्या भागातून आणलेली मुख्य वाहिनी दिवसातून चार-पाच वेळा तुटून पडते आणि ती पूर्ववत करताना वीज कर्मचार्यांची तारांबळ उडते. मयेवासीय उकाड्यामुळे आणि डासांमुळे त्रस्त झाले आहेत. या कारणामुळे रात्री जागून काढाव्या लागतात. मये गावासाठी जोडणारी मुख्य वीजवाहिनी नार्वे, वरपाल, बायंगिणी येथील डोंगरमाथ्यावरून आणलेली आहे. ही वीजवाहिनी नंतर इथल्या चिखलमय व दलदलीच्या भागातून पुढे मये गावाला जोडली आहे. लोखंडी खांब गंजलेले आहेत. वीज तारा जुन्या असल्याने हलक्याशा वार्यानेही त्या तुटून पडतात. हा भाग अडचणीचा असल्याने रात्रीच्या वेळी दुरुस्ती करण्यात बरीच अडचण निर्माण होते. ही वीजवाहिनी बदलावी म्हणून नागरिकांनी वारंवार मागणी करूनही वीज खात्याने मयेवासियांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावणे पसंत केले आहे.विजेच्या समस्या निवारण्यासाठी मयेत भूमिगत वीजवाहिनी घालणे हाच तेवढा उपाय आहे. शारदानगर येथून किंवा पैरा फिडरवरून अंडरग्राउंड केबल घालून पंचायत कार्यालयापर्यंत आणून येथील फिडरला पुरवठा के ल्यास विजेची समस्या कायमची सुटणार आहे. त्यासाठी डिचोली वीज कार्यालयाने एक योजना तयार केली असून प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, निधीअभावी ती फ ाईल धूळ खात पडली आहे. गेल्या एक महिन्यापासून मयेवासियांना भेडसावणार्या विजेच्या समस्येमुळे मयेत संतापाचे वातावरण पसरलेले असून याचा कधीही भडका उडू शकतो. (प्रतिनिधी)
पान-५ मयेत वीज समस्या नित्याचीच; नागरिक हैराण
By admin | Published: June 12, 2014 11:47 PM