वृंदावन नगरी असलेल्या मथुरेत आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कपडे परिधानाचे काही नियम पाळावे लागणार आहेत. येथील अनेक मंदिरात पूर्वीपासूनच विशिष्ट पोशाख परिधान करुन येण्याची प्रथा आहे. आता, येथील पागलबाबा मंदिर आणि आता कैलाश नगर कॉलिनीतील हरि मंदिरातही बुधवारपासून भक्तांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांनी कमी कपड्यात येऊ नये. परिपूर्ण वस्त्रांचा पोशाख परिधान करुनच मंदिरात दर्शनासाठी यावे, हीच भावना यामागे असल्याचे सांगण्यात येते.
मंदिर प्रवेशावेळी काही मर्यादा पाळायला हव्यात, या हेतुने येथील राधा-दामोदर मंदिरापासूनच ड्रेसकोडची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर वृंदावन नगरीतील इतरही मंदिरांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. आता, पागलबाबा मंदिर आणि कैलास नगर कॉलिनीतील हरि मंदिरातही हाच नियम लागू करण्यात आला आहे.
हरि मंदिराचे महंत मुकेश दास यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून तरुण आणि तरुणी लहान-सहान कपड्यांमध्ये मंदिरात दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे, आमचे मन व्यथीत होत होते. यासंदर्भात आम्ही परिसरातील आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसोबत चर्चा केली. त्यावेळी, अनेकांनी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याची सूचना केली. त्यामुळे, आम्ही मंदिराच्या गर्भगृहाच्या भींतीवर नोटीस चिटकवली आहे. आपली हीच सनातन संस्कृती आहे, आपण परिपूर्ण कपडे परिधान करुनच मंदिरात भगवंताचे दर्शन घ्यायला आलं पाहिजे, असे दास यांनी म्हटले.