ऑनलाइन लोकमत -
इटानगर, दि. 14 - चीनने पुन्हा एकदा भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्याच आठवड्यात अरुणाचल प्रदेशमधील कामेंग येथे चीन लष्कराने प्रवेश केला होता. पिपल्स लिबरेशन आर्मीचे 250 जवान या घुसखोरीत सामील होते अशी माहिती भारतीय लष्कराच्या सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र अरुणाचलमध्ये प्रवेश केल्याच्या काही तासातच जवान माघारी फिरले.
चीनने याअगोदरही भारतामध्ये अनेकवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे पुरावेही वारंवार भारताने सादर केले आहेत. मात्र चीनने अद्यापही घुसखोरी रोखलेली नाही आहे. 9 जूनला कामेंगच्या पुर्वेकडे चीनच्या गस्त विभागाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. विेशेष म्हणजे भारताला अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यावरुन चीन विरोध करत असताना अगोदरच दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे, आणि त्याचवेळी चीनकडून ही घुसखोरी झाली आहे.
चीनने यावर्षी घुसखोरी करण्याची ही पहिलीच घटना आहे. चीनने हा आमचा भाग असल्याचा दावा वारंवार केला आहे. चीन लष्कराच्या जवानांनी परत फिरण्याअगोदर सीमारेषेवर तीन तास घालवले असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे.