- विकास झाडे नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुधारणा केलेले शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्ष होणार, या चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसच्या गोटातून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नसला तरी यूपीएच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वास्थ्य लक्षात घेता पवार यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार शनिवारी, १२ डिसेंबर रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. यूपीएमधील सर्वात दमदार नेता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. घटक पक्षातील सर्वच नेत्यांशी पवारांचे उत्तम संबंध आहेत. सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा असल्या तरी त्यांच्या प्रकृतीमुळे नवा पर्याय शोधण्यावर गेले काही दिवस यूपीएमध्ये मंथन सुरू आहे. पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष असला तरी देशातील प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची क्षमता त्यांच्यात आहे. तिसरी आघाडी तयार न होऊ देता ‘एनडीए’ सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे कौशल्य शरद पवार यांच्यातच आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याबाबत घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.देशात राबविणार ‘महाराष्ट्र मॉडेल’महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा यशस्वी पॅटर्न राबविण्याचे श्रेय पवार यांनाच जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद, देशाचे संरक्षणमंत्रिपद आणि सलग दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्रिपद पवार यांनी सांभाळले आहे. सध्या शेतीविषयक कायद्यांवरून देशभरात सरकारविरोधी वातावरण आहे. विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी यूपीएतर्फे राष्ट्रपतींची भेट घेतली. पवारांनी महाराष्ट्रात केलेला प्रयोग देशभरात राबविला जाऊ शकतो, अशी चर्चाही यूपीएच्या घटक पक्षांमध्ये सुरू आहे. यूपीएमधील घटक पक्षांशी सलोख्याचे संबंध असलेल्या शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना कॉँग्रेसमधूनच विरोध होऊ शकतो. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षपदी राहू इच्छित नसतील तर काँग्रेसच्या अन्य नेत्यावर ही जबाबदारी सोपविली जाईल असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
यामागे ‘लेटरबॉम्ब’ नेतेयूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती केली जाईल, हे वृत्त पसरविण्यामागे काँग्रेसचा ‘लेटरबॉम्ब’ गट असल्याचे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पक्षश्रेष्ठींवर प्रश्नचिन्ह उभे करीत काँग्रेसच्या दोन डझन नेत्यांची पत्र लिहिले होते. राष्ट्रवादीकडून मात्र इन्कारशरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, या वृत्ताचा राष्ट्रवादीकडून इन्कार करण्यात आला आहे. दिल्लीतील आंदोलनावरून लोकांचे लक्ष भरकटावे, यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यूपीएच्या घटकपक्षांशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यूपीएचे अध्यक्षपद कसे स्वीकारतील, असा सवाल करत हे निराधार वृत्त असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.