Food Delivery अॅप Zomato पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हसोबत कस्टमरच्या चॅटचा एक स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे. तामिळनाडू मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं Zomato एक्झिक्युटिव्ह कडून आपल्याला हिंदी शिकण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. "कस्टमर केअरसंच असं म्हणणं आहे की मला हिंदी येत नसल्यामुळे आम्ही रिफंड करू शकत नाही. त्यांनी मी खोटा असल्याचंही म्हटलं. याशिवाय कर्मचाऱ्यानं हिदी ही आपली राष्ट्रभाषा असून सर्वांना ती थोडी तरी आली पाहिजी असं म्हटलं," असा आरोप विकास नावाच्या एका व्यक्तीनं स्क्रिनशॉट शेअर करत केला.
यानंतर अनेकांनी Zomato ला हिंदी ही आपली राष्ट्राभाषा आहे का असा प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. याविरोधात युझर्सनं आता सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली असून #Reject_Zomato हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तसंच अनेकांनी Zomato नं यावर स्पष्टीकरण द्यावी अशी मागणीही केली आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातही मराठीसाठी आवाज उठवण्यात आला होता. दुकानांवरील पाट्या, एटीएममध्ये मराठी भाषेचा पर्याय किंवा ऑनलाईन अॅपमध्येही मराठीच्या पर्यायासाठी मागणी करण्यात आली होती. यापूर्वी मनसेनं Amazon वर मराठीचा पर्याय मिळावा अशी मागणी केली होती. त्यानंतर Amazon नं तात्काळ बदल करत खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला होता.