Rekha Gupta Delhi New CM: दिल्लीला अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश वर्मा हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर, रोहिणी मतदारसंघाचे आमदार विजेंद्र गुप्ता यांना दिल्ली विधानसभा अध्यक्ष असतील.
भाजप हायकमांडने वरिष्ठ नेते ओपी धनखर आणि रविशंकर प्रसाद यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. प्रवेश वर्मा यांनीच रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. दरम्यान, रेखा गुप्ता उद्या(20 फेब्रुवारी) दुपारी 12.30 वाजता रामलीला मैदानावर एका भव्य समारंभात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे.
निकालानंतर 11 दिवसांनी मुख्यमंत्र्यांची घोषणादिल्लीत 26 वर्षांनंतर भाजपला मोठा विजय मिळाला आहे. 8 फेब्रुवारीला जाहीर झालेल्या निकालात भाजपला 70 पैकी 48 जागा मिळाल्या. निकालानंतर 11 दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवासरेखा गुप्ता संघाच्या विचारात वाढलेल्या असून विद्यार्थी संघटनेपासून भाजपात कार्यरत आहेत. 1994-95 ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 1995-96 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या, तर 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्ष बनल्या. यानंतर 2004-2006 ला त्यांना युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले. 2007 मध्ये त्या उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. 2010 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.
2 वेळा विधानसभेला पराभूतरेखा गुप्ता यांचा 2015 आणि 2020 ला विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. 2015 आणि 2020 मध्ये आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यावेळी रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. आता पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्यानंतर थेट त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे.