नवी दिल्ली : भाजपच्या आ. रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. रामलीला मैदानावर गुरुवारी दुपारी १२:०० वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. दिल्ली प्रदेश भाजप कार्यालयात केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी त्यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली.
शालिमार बाग मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांचा जन्म हरयाणात झाला. त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित व आतिशी यांच्यानंतर त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील. रामलीला मैदानावर गुरुवारी होणारा शपथविधी समारंभ भव्य-दिव्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी व एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.