मध्य प्रदेश- मंदसोरमध्ये राहुल गांधी पोहोचण्याआधीची प्रशासन सतर्क झालं आहे. गेल्या वर्षी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात अनेक शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना राहुल गांधी भेटण्यास गेले असता त्यांना भेटू दिले नव्हते. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अभिषेकच्या आई-वडिलांनी सांगितलं की, राहुल गांधी भेटू नका, अशी आम्हाला प्रशासनानं धमकी दिली आहे.अभिषेक याच्या मृत्यूनंतर सरकारनं त्याचा भाऊ संदीप पाटीदार याला नागपुरात नोकरी दिली होती. तुम्ही सरकारी नोकरीत आहात, जर तुमच्या आईवडिलांनी राहुल गांधींची भेट घेतली तर तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते, अशी धमकी एडीएम आर. के. वर्मा यांनी फोनवरून दिली आहे. यापूर्वी अभिषेकचे काका मधुसूदन पाटीदार याना मंदसोर प्रसासनानं राहुल यांच्या रॅलीमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. अभिषेकचे कोण कोण कुटुंबीय राहुल गांधी यांची भेट घेत आहेत, याची माहिती मी फोनवरून घेत असल्याची माहिती एडीएम आर. के. वर्मा यांनी दिली आहे.गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान 5 लोकांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. यात 17 वर्षांच्या अभिषेकबरोबरच सत्यनारायण, घनश्याम, बबलू उर्फ पूनमचंद आणि कन्हैया लाल यांचाही मृत्यू झाला होता. गोळीबारातील मृतांच्या कुटुंबीयांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासनही सरकारनं पूर्ण केलं नव्हतं. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान गोळीबार झालेल्या मंदसोरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संबोधित करणार आहेत. राहुल गांधी दुपारी विशेष विमानानं मध्य प्रदेशात दाखल होणार आहेत.
मंदसोर गोळीबारातल्या मृतांचा कुटुंबीयांना राहुल गांधींच्या रॅलीला जाण्यास मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 12:52 PM