चंडीगढ - हरियाणा सरकारने कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यावयचा आहे, त्या विद्यार्थ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे व्हॉट्सअॅपद्वारे निकालपत्र आणि आवश्यक ती कागदपत्रे पाठविल्यानंतर 10 वी पास विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानुसार सद्यस्थितीत महाविद्यालयाची फी जमा करणेही बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री कंवल पाल यांनी सांगितले आहे. सोशल डिस्टन्स पाळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना घरात बसूनच अकरावीची प्रवेश प्रकिया पूर्ण करता येईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि खबरदारी म्हणून हरियाणा सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री कंवल यांनी दहावी बोर्डाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर करताना, परीक्षार्थी आणि शिक्षकांचेही अभिनंदन केले.