बनासकांठा, दि. 9 - गुजरातमधील 4 पूरग्रस्त गावांना रिलायन्स फाऊंडेशन दत्तक घेणार आहे. तसेच त्या गावांना रिलायन्स फाऊंडेशन 10 कोटींची आर्थिक मदतही करणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा नीता अंबानी यांनी ही माहिती दिली आहे. नीता अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन तेथील पीडितांची भेट घेतली. नीता अंबानींनी पूरग्रस्तांची चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या असून, रिलायन्स फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांना देणा-या मदतीची त्या वेळोवेळी समीक्षाही करणार आहेत.नीता अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशननं बनासकांठा व पाटण जिल्ह्यांतील 4 गावांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. तसेच या गावांना रिलायन्स फाऊंडेशन 10 कोटींची आर्थिक मदतही देणार आहे. या गावांना दत्तक घेण्यासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशन गुजरात सरकारसोबत चर्चा करत आहे. रिलायन्स फाऊंडेशन देऊ केलेल्या सहकार्यामध्ये घरं, शाळा, आरोग्य सुविधा, सार्वजनिक हॉल आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांच्या बांधकामाचा समावेश असेल.नीता अंबानी म्हणाल्या, आम्ही या गावांच्या पुनर्निर्माणासाठी 10 कोटी रुपये खर्च करणार आहोत. या सर्व गोष्टी करत असताना पूरग्रस्त गावांना खाण्याच्या सामानाचं एक किटही वितरित करण्यात येणार आहे. या किटमध्ये 10 किलो तांदूळ, 10 किलो पीठ, 1 किलो मीठ, 2 किलो साखर, 2 तेलाच्या बॉटल्स व मसाल्याचा समावेश आहे. हे किट 15 दिवसांच्या खाण्यासाठी पर्याप्त आहे. नीता अंबानी पूरग्रस्तांना वेळोवेळी मदत मिळावी, यासाठी लक्ष घालणार आहेत.
गुजरातमधील पूरग्रस्त गावांना रिलायन्स घेणार दत्तक, 10 कोटींची देणार आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 7:55 PM