नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती निर्माण केली आहे. समूहाने या कालावधीत ६.३ लाख काेटी रुपयांची संपत्ती निर्माण केल्याची माहिती ‘माेतीलाल ओसवाल वेल्थ क्रिएशन स्टडी’मधून देण्यात आली आहे.
या अहवालानुसार १९९५ ते २०२० या कालावधीत रिलायन्स समूहाने ही संपत्ती निर्माण केली असून तब्बल ३.७८ लाख काेटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी ४.९ लाख काेटी रुपयांची संपत्ती निर्माण करून दुसऱ्या स्थानावर आहे. निव्वळ नफ्याचा विचार केल्यास रिलायन्सनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक असून बँकेने १.७२ काेटी रुपयांचा नफा कमविला आहे. तर आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फाेसिस ही १.५ लाख काेटींच्या नफ्यासह तिसऱ्या स्थानी आहे. इन्फाेसिससह बजाज फायनान्सने या यादीत अतिशय लवकर टाॅप टेनमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येते. इन्फाेसिसचा १९९५ मध्ये केवळ १३ काेटी नफा हाेता. ताे २०२० मध्ये तब्बल १२०० पटीने वाढून १६ हजार ४५० काेटींपर्यंत पाेहाेचला आहे.