आसाममध्ये सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २४ मध्ये पुरामुळे १० लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ११७ वर पोहोचला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. ताज्या अहवालानुसार आसाममधील २८ जिल्ह्यांतील ३३.०४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर शुक्रवारी ३० जिल्ह्यांतील ४५.३४ लाख लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधी (CMRF) मध्ये २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.
यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. मुख्यमंत्री मदत निधीला २५ कोटी रुपयांची देणगी देऊन या कठीण प्रसंगी आसामच्या लोकांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे मनःपूर्वक आभार, असं त्यांनी म्हटलं आहे.
अनेकांकडून मोठी मदतमीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी आणि अनंत अंबानींशिवाय इतर अनेक लोकांनीही मदत निधीसाठी मोठी रक्कम दिली आहे. दलाई लामा यांनी त्यांच्या ट्रस्टकडून १० लाख रुपयांची मदत केली आहे. त्याचवेळी ऑईल इंडिया लिमिटेडने ५ कोटी रुपये, टी-सीरीजचे मालक आणि निर्माते भूषण कुमार यांनी आसामच्या लोकांसाठी ११ लाख रुपयांची मदत केली आहे. यासोबतच प्रसिद्ध गायक सोनू निगम, बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांनी मुख्यमंत्री मदत निधीला (CMRF) प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे.