मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी तिरूपती बालाजी मंदिरात दीड कोटी रुपये दान केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांना भगवान वेंकटेश्वराबद्दल अपार श्रद्धा आहे. तिरुमलाजवळील टेकडीवर वसलेल्या भगवान वेंकटेश्वराच्या या प्राचीन मंदिरात मुकेश अंबानी यांच्यासह अन्य काही लोकांनीही दर्शन घेतलं. यामध्ये एन्कोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आणि रिलायन्सचे अन्य अधिकारी होते. मंदिराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
मंदिराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी शुक्रवारी पहाटे मंदिरात पोहोचले. दर्शन घेतल्यानंतर अंबानी यांनी तिरुमाला तिरुपती देवस्थानमचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी (टीटीडी) ए.के. वेंकट धर्मा रेड्डी यांच्याकडे दीड कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यानंतर त्यांनी तिरुमला टेकडीवर असलेल्या एका गेस्टहाऊसमध्येही काही काळ घालवला.