नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जिओचे सिमकार्ड इतर कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे जिओला मोठा फटका बसला असून, याप्रकरणी जिओने दूरसंचार नियामक ‘ट्राय’कडे व्हाेडाफोन इंडिया आणि एअरटेल यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. या दोन्ही कंपन्या अनैतिक मार्गांचा अवलंब करून जिओविरुद्ध अफवा पसरवीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी बिलांच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नव्या कृषी कायद्यांमुळे रिलायन्स उद्योगसमूहास फायदा होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचा फटका जिओला बसला असून, जिओची सिमकार्ड्स इतर कंपन्यांकडे हस्तांतरित (पोर्ट) करून घेण्याच्या विनंत्या जिओला हजारोंच्या संख्येने मिळत आहेत. या सर्व प्रकारामागे व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांचा थेट हात असल्याचा आरोप जिओने केला आहे. नव्या कृषी कायद्यांचा रिलायन्सला फायदा होणार असल्याची अफवा व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी पसरविली असल्याचा आरोप जिओने केला आहे. दोन्ही कंपन्यांनी फेटाळले आरोपव्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी जिओचे आरोप फेटाळून लावले आहेत. एअरटेलने ट्रायला सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, एअरटेल मागील २५ वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात सचोटीने व्यवसाय करीत आहे. काही स्पर्धकांनी चिथावणीखोर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दादागिरीचे हातखंडे वापरले तरीही एअरटेलने संयम दाखवून आपले स्पर्धक आणि भागीदारांचा योग्य तो सन्मानच केला. आमच्या विरोधातील तक्रार फेटाळून लावण्याच्याच लायकीची आहे. ही तक्रार अभिरुचीहीन आणि अश्लाघ्य आहे.
व्होडाफोन, एअरटेलविरोधात जिओची तक्रार; शेतकरी आंदोलनाचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 3:54 AM