अहमदाबादगुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड भव्य प्राणीसंग्रहालय उभारणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विशेष म्हणजे, हे प्राणीसंग्रहालय जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
प्राणीसंग्रहालयात भारत आणि जगातील १०० हून अधिक विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी असणार आहेत. जामनगरच्या मोती खवडी येथील रिलायन्सच्या रिफायनरी प्रकल्पाजवळच्या २८० एकर जागेवर हे भव्य प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे.
रिलायन्सचा याच परिसरात जगातील सर्वात मोठा तेल रिफायनरी प्रोजेक्ट आहे. यात पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाचाही समावेश आहे. याच प्रकल्पाच्या जवळच जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय तयार केलं जाणार आहे.
प्राणीसंग्रहलयाचं काम कोविड-१९ मुळे रखडलं होतं. पण ते पुढील दोन वर्षात पूर्ण होण्याची ग्वाही, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. "प्राणी संग्रहालयाला 'ग्रीन झूलॉजिकल, रेस्क्यू आणि रिहॅबिल्टेशन किंडम' असं नाव देण्यात येणार आहे. प्राणी संग्रहालयासाठीच्या सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळाल्या आहेत.", असं कंपनीचे संचालक (कॉर्पोरेट व्यवहार) परिमल नथवाणी यांनी सांगितलं.
प्राणी संग्रहालयात 'फॉरेस्ट ऑफ इंडिया', 'फ्रॉग हाउस', 'इनसेक्ट लाइफ', 'ड्रॅगन्स लँड', 'एग्झॉटीक आयसलँड', 'वाइल्ड ट्रेल ऑफ गुजरात' आणि 'अॅक्वाटीक किंडम', असे विविध प्रभाग असणार आहेत.
हरणं, लॉरिस, अस्वल, फिशिंग कॅट, कोमोडा ड्रॅगन्स, लांडगे आणि गुलाबी बगळे हे विशेष आकर्षण असणार आहे. यासोबतच आफ्रिकन सिंह देखील पाहायला मिळणार आहेत. १२ शहामृग, १० मगर, २० जिराफ, १८ आफ्रिकन मीरकॅट, ७ बिबटे, आफ्रिकन हत्ती असणार आहेत.