ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 29 - गुजरातमध्ये ढोलवीरा येथे गाडल्या गेलेल्या हडप्पन बंदरातील बांधकामांचे अवशेष राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ)शास्रज्ज्ञांना सापडले असून त्सुनामीमध्ये नष्ट झालेले जगातील हे पहिलेवहिले बंदर शहर असल्याचा दावा शास्रज्ज्ञांनी केला आहे. अधिक संशोधनासाठी ३४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव केंद्राकडे ठेवण्यात आला आहे.
दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. नक्वी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कौन्सिल फॉर सायन्टिफिक रिसर्च (सीएसआयआर) आणि एनआयओ यांनी संयुक्तपणो हे संशोधन हाती घेतले. गुजरातमध्ये कच्छच्या रणात 5 हजार वर्षापूर्वीचे हे बंदर वसविले होते. बांधकामाचे जे अवशेष सापडले आहेत त्यावर मातीचे थर ज्या पद्धतीने आढळलेत ते पाहता दीड हजार वर्षापूर्वी त्सुनामी येऊनच ही बंदर वसाहत गाडली गेली असावी, असा शास्रज्ञांचा दावा आहे.
एनआयओचे ज्येष्ठ शास्रज्ञ राजीव निगम यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. जे. लोवेसन, ए. एस. गौर, सुंदरेशन, एस. एन. बांदोडकर, रायन लुईस, गुरुदास तिरोडकर व रूपल दुबे या शास्रज्ञांच्या पथकाने या शोधमोहिमेत भाग घेतला.
18 मीटर जाडीची संरक्षक भिंत
भारतीय पुरातत्व खात्याकडून आवश्यक ते परवाने घेऊन उत्खनन करण्यात आले. बंदराच्या ठिकाणी बांधलेली भिंत 14 ते 18 मीटर जाडीची आढळून आली. इतक्या जाडीची भिंत ही प्राण्यांपासून किंवा शस्नस्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी नव्हे तर त्सुनामीपासून बचावासाठीच त्या वेळी बांधण्यात आली असावी, असे शास्रज्ञ निगम यांचे मत आहे. पुरातत्व उत्खननात या ठिकाणी शत्रूपासून संरक्षणासाठी जाड भिंतीची जुनी मोठी गढी (किल्ला), मध्य शहर व निम्न शहर असे तीन वेगवेगळे भाग आढळून आलेले आहेत. भूमिगत शोध घेणारे ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) या शोधकामासाठी वापरला तसेच मातीचे नमुनेही तपासणीसाठी घेतले. अडीच ते साडेतीन मीटर मातीचा थर आढळून आला. या ठिकाणी काही सूक्ष्म जीवांचे अवशेषही सापडले असून यात शिंपल्यांचाही समावेश आहे. हे जीव त्सुनामीतूनच आले असावेत, असा शास्रज्ञांचा ठाम दावा आहे. गाडल्या गेलेल्या बंदर वसाहतीवर मातीचे थर निश्चितपणो कोणत्या काळात साचले, याचा सखोल अभ्यास चालू आहे.
‘गुजरातला त्सुनामीचा कायमच धोका’
ढोलवीरा बंदर शहर नष्ट होण्याची घटना 1500 वर्षापूर्वी घडली असली तरी गुजरातच्या या किनारपट्टीला त्सुनामीचा धोका असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. संरक्षणासाठी 18 मीटर जाडीची भिंत हडप्पनांनी बांधली, त्यामुळे त्यांना त्या वेळीही त्सुनामीच्या धोक्याची जाणीव होती व त्यांनी आपल्या पद्धतीने किनारपट्टी व्यवस्थापन केले होते, हे स्पष्ट होते. या भागाला त्सुनामीचे संकट नवीन नाही. 28 नोव्हेंबर 1945 रोजी गुजरातेतील मोठय़ा त्सुनामीचा फटका मुंबई, रत्नागिरीर्पयत बसला. त्या वेळी समुद्रात 10 मीटर्पयत उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. गोव्यात पोतरुगीज राजवट होती आणि गोव्यालाही त्सुनामीची झळ पोचलेली असावी, असे संचालक नक्वी म्हणाले.
गुजरात सरकारने निधी नाकारला
दोन वर्षाच्या काळासाठी संशोधन व इतर गोष्टींकरिता 10 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव गुजरात सरकारकडे ठेवला होता; परंतु संस्था परराज्यातील असल्याची सबब देऊन त्या सरकारने प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर केंद्रीय संस्कृती मंत्रलयाकडे निधीसाठी संपर्क केलेला आहे; परंतु अजून प्रतिसाद मिळालेला नाही, असे शास्रज्ञ निगम यांनी सांगितले.