मध्य प्रदेशमधील बैतुल जिल्ह्यात 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या तन्मय साहूला याला सर्व प्रयत्न करूनही वाचवता आलेले नाही. शनिवारी सकाळी सुमारे 84 तासांनंतर मुलाचा मृतदेह बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आला. मुलाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे पाच डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे पीएम केले, पीएम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गेल्या अनेक तासांपासून लोक तन्मयला बोअरमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करत होते, आता त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
तन्मयला वाचवण्यासाठी बचावकार्यात अनेकांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आठ वर्षीय तन्मय साहूच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून पीडितेच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मंगळवारी सायंकाळी मित्रांसोबत खेळत असताना तन्मय उघड्या बोअरवेलमध्ये पडला, त्यानंतर तासाभराने जिल्हा प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू करून त्याला वाचवण्यासाठी लढा सुरू केला, मात्र बोअरवेलमधील पाण्यामुळे आणि त्याच्या बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला वाचवता आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचा मृत्यू अनेक तासांपूर्वी झाला होता अस सांगण्यात येत आहे, बोअरवेलमध्ये पडून आठ वर्षीय तन्मय साहूचा मृत्यू झाल्याची माहिती बैतूल जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मंगळवार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता मांडवी गावात खेळत असताना तन्मय उघड्या बोअरमध्ये पडला. तो पडल्याचे वृत्त मिळताच तासाभरात बचावकार्य सुरू करण्यात आले. बाळाला बोअरमधून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम सतत वाचवण्याच्या प्रयत्नात होते, माझ्या मुलाला सुखरूप बाहेर काढा, असे तन्मयचे वडील सुनील सांगत होते. शाळकरी मुले आणि गावकरीही तन्मयसाठी प्रार्थना करत होते. तन्मयचे मित्र त्याच्या सुरक्षिततेसाठी गायत्री मंत्राचा जप करत होते, पण अखेर तन्मयचा मृत्यू झाल्याचे समोर आले.