मुंबई : गेल्या महिन्यात महापालिकेने सुरू केलेल्या ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेचे चांगले परिणाम आता मुंबईत दिसत आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या १६ दिवसांत दुप्पट होत आहे. मुंबईत मात्र हे प्रमाण २४.५ दिवसांवर पोहोचले आहे. मुंबईतील मृत्यूदर देशाच्या बरोबरीने तीन टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४४ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत नियंत्रणात असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यापासून एप्रिल महिन्यात सात दिवसांत रुग्ण दुप्पट होत होते. हे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी राज्य सरकारने गेल्या महिन्यात आठ सनदी अधिकाऱ्यांची टीम तयार केली. मुंबईतील सात परिमंडळांची जबाबदारी व कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम या अधिकाऱ्यांना विभागून देण्यात आले होते. या काळात केलेल्या उपाययोजनांमुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण १६ दिवसांवर पोहोचले. ते आता २४.५ दिवस झाले आहे.मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेच्या माध्यमातून अनेक बदल घडवून आणले. यामध्ये एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाइन करणे, रुग्णांवर दर्जेदार उपचार, योग थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या साहाय्यक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्यात लवकरच यशस्वी होऊ, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.पालिकेच्या माध्यमातून मुंबईत १६८ ठिकाणी डायलिसीसची सुविधा सुरू केली. त्यामुळे गेल्या २० दिवसांत एकही डायलिसीसअभावी मृत्यू झाला नाही. विभाग स्तरावर सुरू केलेल्या वॉररूममुळे खाटा न मिळणे या तक्रारी दूर होणार आहेत. तसेच खासगी रुग्णालय, नर्सिंग होममध्ये चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.हॉटस्पॉट बनलेल्या धारावी विभागात सध्या रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण तब्बल ४२ दिवसांवर गेले आहे. गेल्या महिन्यात या विभागात एका दिवसात ८० ते ९० कोरोनाबाधित आढळून येत होते. हे प्रमाण आता दररोज सरासरी दहा रुग्ण आहे. मुंबई पालिकेकडे सध्या ५० हजारांहून जास्त रुग्णखाटा उपलब्ध आहेत. यापैकी10400खाटा पालिकेच्या पोर्टलवर नोंदणीसाठी उपलब्ध आहेत. पुढील दहा दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढविण्यात येतील.
‘चेसिंग द व्हायरस’ मोहिमेने दिलासा, देशाच्या तुलनेत मुंबईची स्थिती चांगली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 8:51 AM