नवी दिल्ली : परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा कायदा) उल्लंघन केल्यासंबंधीच्या २००१ मधील एका प्रकरणात तपासासाठी जातीने हजर होण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्याविरुद्ध समन्स जारी केले आहे.अधिकृत सूत्रांनी सांगितले की, भारताच्या पाकिस्तानमधील उच्चायोगामार्फत राहत फतेह अली खान यांना समन्स पाठविण्यात आले आहे. ‘फेमा’ कायद्याच्या कलम ३७ अन्वये तपासी अधिकाऱ्यांपुढे जबानी देण्यासाठी त्यांना ‘ईडी’च्या दिल्ली क्षेत्रिय कार्यालात हजर राहण्यासाठी हे समन्स काढण्यात आले आहे.सन २०११ मध्ये राहत फतेह अली खान आणि त्यांचे साथीदार भारतातील कार्यक्रम आटोपून पाकिस्तानला परत जात असता महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवून तपासणी घेतली असता त्यांच्याकडे जाहीर न केलेली १.२४ लाख अमेरिकन डॉलर व अन्य परकीय चलनातील रक्कम सापडली होती.‘फेमा’ कायद्याच्या उल्लंघनाची प्रकरणे ‘ईडी’ हाताळत असल्याने नंतर हे प्रकरण त्यांच्याकडे आले. गेले वर्षभर ‘ईडी’ने राहत फतेह अली खान यांना तपासासाठी व्यक्तिश: चौकशीसाठी न बोलविता तपास केला व त्यांच्याकडे आढळलेल्या परकीय चलनाचा स्रोत रिझर्व्ह बँकेकडून जाणून घेतल्यानंतर आता त्यांना बोलाविण्याचे ठरविले आहे. त्या दौऱ्यात त्यांनी भारतात किती कार्यक्रम केले व त्याची किती बिदागी मिळाली याची माहितीही ‘ईडी’ने त्यांच्याकडून घेतली होती. याआधी राहत फतेह अली खान यांनी वकील केले होते व ते ‘ईडी’च्या तपासात माहिती देत होते. एवढी मोठी रक्कम प्रवासात सोबत नेण्यात काहीच गैर नाही कारण राहत फतेह अली खान साथीदारांच्या मोठ्या गटासह प्रवास करीत होते, असे स्पष्टीकरण वकिलांमार्फत आधी दिले गेले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राहत फतेह अली खानना समन्स
By admin | Published: October 08, 2014 2:30 AM