जम्मू काश्मीर विधानसभेची तब्बल १० वर्षांनी निवडणूक होत आहे. भाजपा तिथे एकटी लढत असून आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भाजपासाठी आनंदाची बातमी आहे. कारण हिंदू मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. ३७० कलम रद्द करणे, दहशतवादाचे कंबरडे मोडणे, काश्मीरी पंडितांना त्यांच्या मूळ स्थानावर परत नेणे आदी गोष्टी भाजपाला फळताना दिसत आहेत.
आज जम्मू काश्मीरमधील २४ जागांवर मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान झाले आहे. सकाळीच मतदान केंद्रांवर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. राजकीय पक्षांबरोबरच मतदारांमध्येही निवडणुकीसाठी मोठा उत्साह आहे. पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांवर काँग्रेस-एनसी आघाडी, पीडीपी आणि इतर अनेक पक्षांचे उमेदवार निवडणूक रंजक बनवत आहेत.
कुलगाम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मतदान सुरू आहे. मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणारे बहुतांश लोक आहेत. बहिष्काराने काहीही साध्य झाले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक मतदारसंघांमध्ये सकाळी ६ वाजल्यापासूनच लोकांनी रांगा लावल्या होत्या.
जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे ११.११ टक्के मतदान झाले. त्यापैकी अनंतनाग जिल्ह्यात १०.२६%, डोडा जिल्ह्यात १२.९०%, किश्तवाड जिल्ह्यात १४.८३%, कुलगाम जिल्ह्यात १०.७७%, पुलवामा जिल्ह्यात ९.१८%, रामबन जिल्ह्यात ११.९१% आणि शोपियान जिल्ह्यात ११.४४% मतदान झाले आहे.