नवी दिल्ली: अलाहाबाद उच्च न्यायालयाने शनिवारी शरजील इमामला मोठा दिलासा दिला. न्यायालयाने 2019 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व(दुरुस्ती) कायद्याविरोधात कथितरित्या आक्षेपार्ह भाषण दिल्याप्रकरणी देशद्रोहाचा खटल्यात शरजील इमामला जामीन मंजूर केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंग यांनी जामीन मंजूर केला. शर्जील इमामच्या जामिनावर सविस्तर आदेश अद्याप जारी झालेला नाही.
अनेक राज्यात शर्जीलविरोधात गुन्हे दाखलजेएनयूचा माजी विद्यार्थी आणि शाहीन बाग आंदोलनाचा मुख्य संयोजक असलेल्या शर्जील इमामला गेल्या वर्षी बिहारच्या जेहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. शर्जील इमामने आपल्या भाषणात आंदोलकांना भारत सोडण्यास सांगितले होते. मणिपूर, असाम आणि अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनीही शर्जीलविरुद्ध एफआयआर नोंदवले होते. पण, शर्जीलला असाम आणि अरुणाचल प्रदेश प्रकरणात यापूर्वीच जामीन मिळाला होता.
आक्षेपार्ह भाषणामुळे हिंसा भडकलीशरजील इमामवर प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप होता, ज्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर हिंसाचार झाला. एप्रिलमध्ये दिल्लीपोलिसांनी शर्जील इमामवर देशद्रोहाचा आरोप खटला दाखल केला होता. त्याच्याच भाषणामुळे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात दंगल भडकल्याचा ठपका ठेवण्यात आला.
शरजील दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद
शरजील इमाम सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्याच्यावर दिल्लीतील दंगलीचा कट रचणे आणि जामियामध्ये झालेल्या हिंसाचाराचा आरोप आहे. गेल्या महिन्यात शर्जीलने दिल्ली न्यायालयात तो दहशतवादी नाही आणि त्याच्याविरुद्ध सुरू असलेला खटला कायद्याने स्थापन केलेल्या सरकारमुळे नाही तर राजाच्या आदेशाचा परिणाम आहे, असा युक्तीवाद केला होता.
यूएपीए अंतर्गत शरजील विरुद्ध गुन्हा
शरजील इमामवर UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो जानेवारी 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल आहे. शरजीलवर दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारी कट रचणे, देशद्रोह करणे आणि धर्माच्या आधारावर गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे असे आरोप केले आहेत. तसेच, त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 124A, 153A आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.