खुशालचंद बाहेती -
चेन्नई : एखाद्याने आपला धर्म सोडून दुसरा स्वीकारला तरी जन्मापासून असलेली त्याची जात बदलत नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) दिला आहे. पी. सर्वानन हे आदि-द्रविड जातीचे आहेत. याजातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये आहे. त्यांनी पुढे ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणून त्यांना मागास जातीचे (बॅकवर्ड कास्ट) असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. पी. सर्वानन यांनी जी. अतीयानीती या हिंदू-अरूनथथीयार मुलीशी लग्न केले. यांचा समावेशही अनुसूचित जातीमध्ये होतो व त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे.लग्नानंतर पी. सर्वानन यांनी त्यांना आंतरजातीय विवाहित असे प्रमाणपत्र मिळावे म्हणून सेलम जिल्ह्यातील तहसीलदारांकडे अर्ज केला, जो अमान्य करण्यात आला. सेलम जिल्हाधिकारी यांनीही याविरुद्धचे अपील फेटाळले. पी. सर्वानन यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना आंतरजातीय विवाहित असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. यामागे उद्देश हा की, त्यांना आंतरजातीय विवाहितांना मिळणाऱ्या शासकीय सवलती मिळाव्यात. यात नोकरीत प्राधान्यही मिळते. उच्च न्यायालयात त्यांच्याकडे मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र आहे व पत्नीकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आहे म्हणून हा विवाह आंतरजातीय असल्याचा त्यांचा दावा होता. उच्च न्यायालयाने मुळात ते जन्माने अनुसूचित जातीचे आहेत. धर्मांतरण केल्याने त्यांची जात बदलत नाही. पती-पत्नी दोघेही अनुसूचित जातीचे आहेत. त्यामुळे त्यांचा विवाह आंतरजातीय ठरत नाही असे स्पष्ट करत ही याचिका फेटाळली.
उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या १९८६ सालच्या सुसाई वि. भारत सरकार (१९०६ एआयआर ७३३) या निकालाचा आधार घेतला आहे. यात अनुसूचित जातीची व्याख्या घटनेच्या परिच्छेद ३६६ (२४)मध्ये दिलेली आहे. जाती व्यवस्था सुरुवातीला व्यवसायावर आधारित होती, पुढे ती जन्मावर आधारित झाली. आता जात जन्मावरून ठरते असे नमूद केले आहे.
जन्मत: असलेली जात एका धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार केल्याने बदलत नाही. धर्म परिवर्तनामुळे मूळ जातीचे अनुसूचित जाती, जमाती, अति मागासवर्गीय, मागासवर्गीय इत्यादी वर्गीकरण बदलत नाही.- न्या. एस. एम. सुब्रमण्यम, मद्रास उच्च न्यायालय