Remal Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'रेमल' चक्रीवादळामुळेपश्चिम बंगालच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, रेमल आज मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकेल. सध्या कोलकाता शहरातील काही भागात पाऊस पडत आहे. बंगालचे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस राज्यातील लोकांना चक्रीवादळाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक घेतली.
एनडीआरएफ पूर्व क्षेत्राचे कमांडर गुरमिंदर सिंग यांनी सांगितले की, रेमल चक्रीवादळ आज मध्यरात्री किनाऱ्यावर धडकेल. लँडफॉलच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 120-130 किमी असेल. या पार्श्वभूमीवर दक्षिण बंगालमध्ये NDRF च्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे चक्रीवादळ त्यापूर्वी आलेल्या अम्फानसारखे गंभीर नसेल. दुसरीकडे, या चक्रीवादळामुळे बांग्लादेशने मोठ्या प्रमाणावर धोकादायक ठिकाणांहून लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळ 21 तासांपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, तर शेकडो गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, कोलकाता, पूर्व मिदनापूर, हावडा, हुगळी येथे मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असून, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यतासोमवारी नादिया आणि मुर्शिदाबादमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलकाता, हावडा, 24 परगणा, हुगळी, बीरभूम, पूर्व बर्दवानमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण बंगालमधील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. रविवारी दोन्ही 24 परगणा भागात पावसासह ताशी 100 ते 120 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोलकाता, हावडा, हुगळी आणि पूर्व मिदनापूरमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किमीपर्यंत पोहोचू शकतो. वादळाचा कमाल वेग ताशी 90 किमी असू शकतो.