नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये मोदींनी मंत्र्यांना दोन मोठे सल्ले दिले. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर दिलेल्या विधानावर योग्य उत्तर द्या आणि भारत विरुद्ध इंडिया वादात कुठलीही विधाने करू नका. जे अधिकृत प्रवक्ते आहेत, त्यांनीच बोलावं, असे सल्ले मोंदीनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत.
पंतप्रधान मोदींनी जी-20 बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ज्या मंत्र्यांना परदेशातील राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधींसोबत राहण्यास सांगितले आहे, त्यांनी त्या देशाची संस्कृती, जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींची प्राथमिक माहिती आधीच मिळवावी आणि त्या पाहुण्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खात्री घ्यावी, असे निर्देशही मोदींनी मंत्र्यांना दिले आहेत.
उदयनिधी स्टॅलिनच्या वक्तव्याने वाद?सनातन धर्मावरील उदयनिधी यांच्या वक्तव्याला भाजप मोठा मुद्दा बनवण्याच्या तयारीत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे सुपूत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोनाशी तुलना केली. तसेच, या धर्माचा नायनाट करा, असेही ते म्हणाले होते. यासोबतच, समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टी सनातनामुळे असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.
भारत विरुद्ध इंडिया गोंधळ सुरूसनातन धर्मावर सुरू असलेल्या गदारोळात भारत विरुद्ध इंडिया वादही सुरू आहे. G-20 बैठकीसाठी राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रणपत्रे जारी करण्यात आली होती. यामध्ये 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमासाठी जारी करण्यात आलेल्या निमंत्रणावर प्रेसिडेंट ऑफि भारत, असे लिहिले आहे.
यानंतर काँग्रेसकडून अशी चर्चा सुरू झाली की, सरकार I.N.D.I.A. युतीला घाबरले आहे, म्हणूनच देशाचे नाव INDIA वरुन भारत करण्याचा डाव आखला जातोय. यानंतर पुढील आठवड्यात बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात भारताचे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव आणला जाऊ शकतो, अशा बातम्या आल्या होत्या.