Remdesivir : धक्कादायक, रेमडेसिविरची नकली इंजेक्शन दिलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के कोरोनाबाधित झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 04:14 PM2021-05-15T16:14:18+5:302021-05-15T16:15:10+5:30
Coronavirus in India: पोलिसांनीच हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तसेच याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
भोपाळ - देशात कोरोनारुग्णांची दुसरी लाट आल्यानंतर ऑक्सिजनसोबतच रेमडेसिविर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामधून रेमडेसिविरची साठेबाजी, काळाबाजार आणि बनावट रेमडेसिविर (Remdesivir ) इंजेक्शनच्या विक्रीला ऊत आला होता. दरम्यान, मध्य प्रदेशमधील इंदूर आणि जबलपूरमध्ये ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातमधून आलेले नकली रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले त्यांच्यापैकी ९० टक्के रुग्णांच्या फुप्फुसामधील संसर्ग बरा झाल्याची धक्कादायक पण आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. पोलिसांनीच हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तसेच याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (90% of the Corona patients who received the fake injection of Remdesivir recovered)
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, इंदूरमध्ये ज्या लोकांना बनावट रेमडेसिविरचे इंजेक्शन दिले गेले, त्यांच्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला. मात्र या इंजेक्शनमध्ये केवळ ग्लुकोज आणि मीठाचे पाणी असूनही १०० हून अधिक जण बरे झाले आहेत. मात्र ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने त्यांच्या शरीराची तपासणी करता येणे शक्य नाही.
इंदूरमधील विजयनगर येथून दोन दिवसांपूर्वीच चार जणांना अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणात पोलिसांना डझरभर लोकांना ताब्यात घेतले आहे. आता पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील मिश्रा, पुनीत शाहा आणि कौशल वोरा यांना गुजरातहून ताब्यात घेणार आहेत. तर पोलिसांनी प्रशांत पाराशर याला भोपळ येथून अटक केली आहे. त्याने १०० नकली रेमडेसिविर इंजेक्शन मुख्य आरोपी सुनील मिश्रा याच्याकडून खरेदी केली होती. दरम्यान, प्रशांत पाराशर हा काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता असून, कोरोनाकाळात त्याच्याकडे काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजराहून ७०० नकली रेमडेसिविर इंजेक्शन मध्य प्रदेशात आणण्यात आळी होती. पहिल्यांदा २०० आणि नंतर ५०० नकली रेमडेसिविर आणली गेली होती. त्यातील १०० रेमडेसिविर प्रशांत पाराशर याला विकण्यात आली. दरम्यान, गुजरातमध्ये या रॅकेटचा भांडाफोड झाल्यावर जबलपूरमधील आरोपी सपन जैन याने पुरावे नष्ट करण्यासाठी ही इंजेक्शन नदीत फेकली होती. दरम्यान, ६० रुग्णांवर या बनावट रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात आल्याचे एका आरोपीने सांगितले.