नवी दिल्ली : परदेशांत वैद्यकीय शिक्षण घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांनाही यंदापासून ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. याची अधिकृत घोषणा काही दिवसांत अपेक्षित आहे.भारतातून दरवर्षी सहा ते सात हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशांत, मुख्यत्वे रशिया व चीनमध्ये जातात. बारावीत किमान ५० टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना यासाठी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून पात्रता प्रमाणपत्र घ्यावे लागते.परदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन आले तरी या विद्यार्थ्यांना त्याआधारे भारतात लगेच डॉक्टरी व्यवसाय करता येत नाही. त्यासाठी त्यांना मेडिकल कौन्सिलतर्फे घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांनाही ‘नीट’ सक्तीची करण्याचे कारण सांगताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, या विद्यार्थ्यांचे भारतात होणाºया परीक्षेतील उत्तीर्णतेचे प्रमाण अल्प आहे. जेमतेम १० ते १५ टक्के विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. यावरून परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी उच्च गुणवत्तेचे नसतात वा तेथील शिक्षणाचा दर्जाही कमी असतो, असे दिसते. त्यामुळे निदान परदेशात जाणारे विद्यार्थी तरी गुणवान असतील, याची खात्री ‘नीट’सक्तीमुळे होऊ शकेल.या अधिकाºयाने असेही सांगितले की, नवा नियम लागू झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेत किमान ५० टक्के पर्सेंटाइलमध्ये गुण मिळाले असतील, त्यांनाच परदेशात शिक्षणासाठी मेडिकल कौन्सिलकडून पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल.भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात दर्जेदार विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सर्वाधिक विद्यार्थी चीनमध्ये जातात, हे लक्षात घेऊन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अलीकडेच चीनच्या शिक्षण मंत्रालयाशी चर्चा केली. त्यानंतर चीन सरकारने तेथील ४५ चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयांची नावे दिली आहेत. मेडिकल कौन्सिल विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र देताना या गोष्टीचाही विचार करेल.>यंदाची ‘नीट’ ६ मे रोजीयंदाची ‘नीट’ परीक्षा ६ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) या परीक्षेची तारीख आणि नियमावली उद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्याची अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली.
परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी ‘नीट’, डॉक्टरांचा दर्जा सुधारण्याचा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:20 AM