जयपूर : भारतीय हवाई दलातील एका अधिकाऱ्यास पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयद्वारे ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून गोपनीय माहिती काढून घेतल्याच्या पार्श्वभुमिवर या प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असून सतर्कता वाढविण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी दिली. हनीट्रॅपची प्रकरणे कनिष्ठ स्तरापर्यंतच मर्यादित असल्याचा दावाही त्यांनी केला.लष्कराच्या भरती रॅलीचे उद्घाटन पर्रीकर यांच्या हस्ते येथे करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत हेरगिरी होत असावी असे मला वाटत नाही. कनिष्ठ स्तरावर अशा काही घटना उघडकीस आल्या असून त्यावर आळा घालण्यासाठी संपूर्ण काळजी घेतली जात आहे. आम्ही सतर्क असलो तर कुणीही आम्हाला लालुच दाखवून आपल्या जाळ्यात अडकवू शकत नाही. त्यामुळे आम्ही सदैव सतर्क राहिलो पाहिजे. भरती आणि प्रशिक्षणाच्या वेळी याबाबत माहिती दिली जाते. जवानांद्वारे सोशल नेटवर्किंग साईटच्या वापराबद्दलही स्पष्ट दिशानिर्देश आणि आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. आयएसआयकडून भारतात मोठ्या प्रमाणात हेरगिरी होत असल्याचे अलिकडील काळात उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांना अटक झाली असून त्यात काही जवानांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात एका माजी जवानास आयएसआयसाठी हेरगिरीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
जवानांना ‘हनीट्रॅप’पासून दूर ठेवण्याचे उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 1:46 AM