मेहा शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनानियमांचे काटेकोर पालन करायचे झाल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावाच लागतो. आता नागरिकांनाही मास्क वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे फिरताना सर्रास मास्कधारी दिसू लागले आहेत. मात्र, या सततच्या मास्क घालण्यामुळेही अनेकांना त्वचेच्या समस्या उद्भवू लागल्या आहे. त्या टाळायच्या असतील तर चेहरा नियमितपणे स्वच्छ धुण्याशिवाय पर्याय नाही, असे एम्समधील त्वचाविज्ञान विषयाचे प्रोफेसर आणि देशातील आघाडीचे त्वचाविकार तज्ञ डॉ. कौशल वर्मा यांनी लोकमतला सांगितले. जाणून घ्या मास्कमुळे होणारे आजार आणि त्यावरील उपाय...
महासाथीदरम्यान अनेक लोकांना कोरोनाशी संबंधित त्वचेच्या समस्या निर्माण झाल्या. त्वचेवर पुरळ उठणे हा त्यातला सामान्य प्रकार. मात्र, फारच गंभीर समस्या असेल तर त्वचेवर फोड येतात किंवा गँगरीन होते. कोरोनोत्तर काळातही त्वचेवर फोड येण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मास्क घालणाऱ्या लोकांना दोन प्रकारचे त्रास जाणवतात. एक म्हणजे मास्कमुळे तोंडावर दाब येतो आणि तोंडाजवळ त्वचेला संसर्ग होतो. दुसरा त्रास म्हणजे मास्कमुळे श्वसनाचा त्रासही जाणवतो. मास्कमुळे तोंडावर पुरळ येणे, संसर्ग असे त्वचेचे विकारही होण्याचा संभव असतो. मास्क कशापासून बनविण्यात आला आहे त्यामुळेही त्रास होतो. कोरोनानंतर केस गळण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती त्यांच्यातही केसगळतीचे प्रमाण वाढले. त्वचेच्या विकारांचे प्रकारही निदर्शनास आले.
मास्क मस्ट, पण मग त्वचेचे रक्षण कसे करावे?
- मास्कपासून होणारे त्वचेचे त्रास टाळण्यासाठी चेहरा नियमितपणे साबणाने धुणे गरजेचे आहे. - तोंडाला घट्ट होणारे मास्क वापरणे टाळा. सैलसर मास्कचा वापर करा.- कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी शक्यतो एन-९५ किंवा सर्जिकल मास्कचा वापर करावा.- कापडापासून बनलेल्या मास्कचाही वापर केला जाऊ शकतो परंतु तो त्रिस्तरीय सुरक्षेचा असावा.
सॅनिटायझरचा सतत वापर करावा का?
सॅनिटाझरमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे सतत ते वापरले तर त्वचेला खाज सुटण्याचे प्रकार वाढतात. शक्यतो सॅनिटायझर न वापरता साबण आणि पाण्याने हात धुवावे. साबण आणि पाणी हेही सॅनिटायझरएवढेच परिणामकारक आहेत.
तापमानवाढीचा त्वचेवर परिणाम
जागतिक तापमानवाढीचा त्वचेवर झपाट्याने परिणाम होऊ लागला आहे. त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे. या शिवाय बॅक्टेरियन इन्फेक्शनही दिसून येत आहे. याशिवाय त्वचेचे अनेक आजार जागतिक तापमानवाढीमुळे वाढू लागले आहेत. - डॉ. कौशल वर्मा, त्वचाविकार तज्ज्ञ, एम्स