खासदारांनो दुसऱ्याच्या जागेवर गेलात तर याद राखा...; लोकसभाध्यक्ष भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 05:30 PM2020-03-03T17:30:01+5:302020-03-03T17:33:35+5:30
आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरूवात केली.
नवी दिल्ली : लोकसभेमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला धक्काबुक्की झाल्याने काल खळबळ उडाली होती. यामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले होते. यावर भाजपाच्या खासदारानेही विरोधी तक्रार केली होती. या साऱ्या प्रकारावर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यांनी दिल्ली हिंसाचारावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. तर अध्यक्ष प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा करण्यास सांगत होते. मात्र, गोंधळ शमत नसल्याने अध्यक्षांनी खासदारांना पूर्ण अधिवेशन निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. जर कोणताही खासदार त्याची जागा सोडून दुसऱ्या खासदाराच्या जागेच्या आसपास जरी फिरकला तरी त्याचे निलंबन होणार हे लक्षात ठेवावे, अशी तंबीच बिर्ला यांनी दिली.
गेल्या आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दिल्ली दंगलीचा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. त्यातच लोकसभेमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या खासदरांमध्ये धक्काबुक्की झाली. गोंधळाच्या या वातावरणात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
जिओचा पुन्हा धमाका! 5G ची ट्रायल घेणार; 4G सारखे पुन्हा मोफत देणार?
योगी आदित्यनाथ यांच्या कारला अपघात; दरीत कोसळता कोसळता वाचले
यावरून लोकसभेमध्ये कामकाजावेळी आरडाओरडा करताना जर कोणी सदस्य दुसऱ्या पक्षाच्या सदस्याच्या जागेवर गेला तर त्याचे पूर्ण सत्रासाठी निलंबन करण्यात येणार आहे. तसेच सदनामध्ये प्लेकार्डही आणण्यावर बंदी आणली आहे.
संसदेचे कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, संसदेमध्ये शिस्त अबाधित राहण्यासाठी तुमच्या नेतृत्वात घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकसभा अध्यक्ष चर्चा करण्यासाठी जो वेळ देतील त्या वेळी सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे.