लक्षात असू द्या, मोदींनाही वाराणसीला जायचं आहे! उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांवरून निरुपम यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 11:58 AM2018-10-08T11:58:02+5:302018-10-08T13:08:28+5:30
बिहारी मजुराने चिमुकलीवर केलेल्या बलात्कारानंतर गुजरातमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीयांमध्ये पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे.
मुंबई - बिहारी मजुराने चिमुकलीवर केलेल्या बलात्कारानंतर गुजरातमध्येगुजराती आणि उत्तर भारतीय असा वाद पेटला असून, स्थानिकांकडून उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहे. तसेट त्यांना राज्य सोडून जाण्याची धमकी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे." पंतप्रधानांचे गृहराज्य असलेल्या गुजरामध्ये जर उत्तर भारतीयांवर हल्ले होत असतील, तर मोदींनीही त्यांना उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे जायचे आहे, हे लक्षात ठेवावे, अशा आशयाचे ट्विट निरुपम यांनी केले आहे.
PM ke grih rajya (Gujarat) mein agar UP, Bihar aur MP ke logon ko maar-maar ke bhagaya jaayega toh ek din PM ko bhi Varanasi jana hai, yeh yaad rakhna. Varanasi ke logon ne unhe gale lagaya aur PM banaya tha: Sanjay Nirupam, Congress (7.10.18) pic.twitter.com/Jc330Czh7D
— ANI (@ANI) October 8, 2018
या ट्विटमध्ये इशारा देताना निरुपम म्हणाले की, "जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमधील लोकांना मारहाण करून पळवण्यात येत असेल तर एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाराणरीला जायचे आहे, हे लक्षात असू द्या." तसेच वाराणसीच्याच लोकांनी नरेंद्र मोदींना स्वीकारले आणि पंतप्रधान बनवले, असेही निरुपम पुढे म्हणाले.
साबरकाठा जिल्ह्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बिहारी मजुराने केलेल्या बलात्कारानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचार तीव्र झाला आहे. त्यातून उत्तर भारतीयांवर हल्ले होत असून, अनेक उत्तर भारतीय कुटुंबांनी राज्यातून पलायन केले आहे. उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 42 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 342 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिली आहे.
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचारामुळे गुजरामधील 6 जिल्हे प्रभावित झाले आहेत, पैकी महेसाणा आणि साबरकांठा जिल्ह्यात या विरोधाती तीव्रता अधिक आहे. तसेच सोशल मीडियावरूनही उत्तर भारतीयांविरोधात भावना भडकावणारे मेसेज फिरवले जात आहेत. असे मेजेस पाठवल्या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
28 सप्टेंबर रोजी एका बिहारी मजुराने 14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलनांना सुरुवात झाली. तसेच उत्तर भारतीयांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या. बुधवारी पोलिसांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात आल्याचे दोन गुन्हे दाखल केले आहेत.