नवी दिल्ली - बॉलीवूडमधील पहिली महिला सुपसस्टार असलेल्या श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशातील मनोरंजन जगत शोकसागरात बुडाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेत्री आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली वाहताना भावूक झालेल्या इराणी यांनी श्रीदेवी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी श्रीदेवी या आपल्या सर्वात आवडत्या अभिनेत्री होत्या, असे म्हटले आहे. इराणी आपल्या पत्रात लिहितात, श्रीदेवी या माझ्या लहापणापासूनच्या आवड्या अभिनेत्री होत्या. त्यांचे चांदनी, चालबाज, सदमा, लम्हे आदी चित्रपट खूप आवडतात. श्रीदेवी यांनी जीवनामध्ये अनेक उतारचढाव पाहिले. मात्र परिस्थितीसमोर हार न मातता त्यांनी यशस्वी वाटचाल केली. माझ्या अभिनेत्री ते राजकारणी बनण्याच्या प्रवासामध्ये श्रीदेवी याच माझ्या आवडत्या अभिनेत्री राहिल्या आहेत. या दरम्यान विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट घेण्याची संधी मिळत असे. तसेच प्रत्येक वेळी त्यांच्याविषयीची काही नवी माहिती मिळत असे."इराणी पुढे लिहितात, "90 च्या दशकात श्रीदेवी यांनी स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटांना सुपरहिट केले होते. त्यामुळेच त्यांना देशातील पहिल्या महिला सुपरस्टार म्हटले गेले. त्यांच्या सहकलाकारांना चित्रपटाच्या यशासाठी श्रीदेवी यांच्यावरच अवलंबून राहावं लागत असे, ही बाब त्यांच्या कर्तृत्वाला अधोरेखित करणारी आहे."यावेळी स्मृती इराणी यांनी श्रीदेवी यांच्या अभिनयाचे कौतुक केले. प्रेक्षकांना केवळ त्यांचे नृत्यच नाही तर त्यांचा विनोदी आणि करुण अभिनयही आवडायचा, श्रीदेवींमध्ये प्रेक्षकांना हसवण्याची आणि रडवण्याची क्षमता होती, असे इराणी यांनी नमूद केले.
श्रीदेवींच्या आठवणीने स्मृती इराणी झाल्या भावूक, पत्र लिहून वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 4:03 PM