झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीने बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची नेता म्हणून निवड केली असून, त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. यासंदर्भात बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जेएमएम आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. ज्येष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवणे अत्यंत दुःखद आहे. मला खात्री आहे की झारखंडची जनता या कृतीचा तीव्र निषेध करतील, असे हिमंता यांनी म्हटले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, "झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पक्षाकडून झारखंडमधील एका ज्येष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री पदावरून हटवणे अत्यंत दुःखद आहे. मला खात्री आहे की, झारखंडची जनता या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करेल आणि हे दृढतेने नाकारेल."
तत्पूर्वी, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सत्ताबदलावर काहीशी नाराजी व्यक्त केली. मात्र, नंतर हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
हेमंत सोरेन यांना काही महिन्यांपूर्वी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी, त्यांनी ३१ मे रोजी अटकेची कारवाई होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, नुकताच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली आहे. आता ते तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते झारखंडचे तेरावे मुख्यमंत्री असतील. १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारचे विभाजन करून झारखंड या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती.