आग्रा : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविण्यात न आल्यास येत्या सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी शेतकरी देशभरात रेल रोको आंदोलन करतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष व आणखी काही जणांना अटक केली आहे. मात्र या कारवाईवर शेतकरी आंदोलक समाधानी नाहीत. लखीमपूर खेरी हिंसाचाराबाबत अजय मिश्रा यांनाही जबाबदार धरून त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री या पदावरून हटवावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. मात्र तसा निर्णय केंद्र सरकारने न घेतल्यास शेतकरी १८ ऑक्टोबर रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन करतील. यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, येत्या सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येईल. आंदोलनादरम्यान रेल्वेगाड्यांची वाहतूक रोखून धरण्यात येईल, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अलिगढ येथे सांगितले. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, हा हिंसाचार घडविण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी कोणती भूमिका निभावली याची चौकशी झाली पाहिजे. त्याआधी त्यांना केंद्र सरकारने मंत्रीपदावरून हटवावे. मात्र त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलेले नाही किंवा अजय मिश्रांकडून मंत्रीपदाचा राजीनामाही केंद्राने घेतलेला नाही.
मंत्र्याला पाठीशी का घालता?- लखीमपूर खेरी येथे हिंसाचार झाला त्याप्रसंगी घटनास्थळी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याने केला होता. मात्र त्याचे पुरावे तो पोलिसांना देऊ शकलेला नाही. - जय मिश्रा यांनाही मोदी सरकार पाठीशी का घालत आहे, असा सवाल शेतकरी आंदोलक विचारत आहेत.