नवी दिल्ली : लोकांना कर प्रशासकांचे भय वाटू नये. भारतीय मुळातच प्रामाणिक आहेत. बळाचा वापर न करता, कर गोळा करण्याचे लक्ष्य गाठता यावे, म्हणून कर अधिकाऱ्यांनी विश्वासाचे वातावरण तयार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.आयकर अधिकाऱ्यांनी करदात्यांच्या मनातील छळ आणि त्रासाचे भय दूर करावे आणि महसूल, उत्तरदायित्व, प्रामाणिकपणा, माहिती व डिजिटलायजेशन (रॅपिड) या प्रशासनाच्या पाच स्तंभावर लक्ष केंद्रित करावे, असे मोदी म्हणाले. नवी दिल्ली येथे पहिल्या दोन दिवसीय ‘महसूल ज्ञान संगम’ या कर प्रशासकांच्या वार्षिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होते.देशातील करदात्यांची संख्या १० कोटींपर्यंत वाढविण्याची आवश्यकता आहे आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे लक्ष्य गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कायद्याचे हात लांब आहेत आणि ते करचोरी करणाऱ्यांना पकडतील, असा इशाराही त्यांनी दिला. देशात सध्या ५.४३ कोटी करदाते आहेत.अधिकाऱ्यांनी करदात्यांसोबत जरा विनम्रपणे आणि सौजन्याने वागले पाहिजे. प्रत्येकासोबत करचोरी करणाऱ्यांसारखे वागू नका. प्रशासन अधिक चांगले व दक्ष बनविण्यासाठी डिजिटलायजेशनच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे आणि ‘अविश्वासाची दरी कमी केली पाहिजे,’ असे मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीबीडीजी आणि सीबीईसीत काम करणाऱ्या १५ अधिकाऱ्यांनी आपल्या नियमित कामकाजाच्या वेळी निर्माण होणाऱ्या अडचणी आणि समस्या उपस्थित केल्या. कर सुलभ कायदा करावा, अशी सूचना या वेळी अधिकाऱ्यांनी केली.
कराचे भय दूर करा
By admin | Published: June 17, 2016 2:47 AM