लखनौ : काही जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावले जात आहेत, हे स्वीकारार्ह नाही, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. संपर्क-संवाद करून आदर्श परिस्थिती निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या पाच कालिदास मार्गावरील शासकीय निवासस्थानी वरिष्ठ शासकीय अधिकारी, विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आणि नाताळ सण सुरक्षितपणे पार पाडण्याचे व कुठेही धर्मांतराची घटना घडू न देण्याचे निर्देश दिले. यासोबतच धार्मिक स्थळांवर पुन्हा लावले जाणारे भोंगे हटविण्यावर त्यांनी भर दिला. या वर्षी एप्रिल महिन्यात राज्य सरकारने धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर केली होती. २५ एप्रिलपासून सुरू झालेली ही मोहीम १ मेपर्यंत सुरू होती. (वृत्तसंस्था)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"