मेरठ - सावरकर जयंतीचं औचित्य साधून अखिल भारतीय हिंदू महासभेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. तसेच भारतीय चलनातील नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो हटवून वीर सावरकरांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. हिंदू महासभेने केलेल्या या मागणीमुळे देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सावरकर जयंतीनिमित्त मेरठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडीत अशोक शर्मा, प्रदेश प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी संयुक्तपणे वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने गौरवून सरकारने त्यांचा सन्मान करावा अशी मागणी केली आहे. तसेच चलनातील नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो हटवून सावरकरांचा फोटो लावण्याचीही मागणी केली आहे. देशप्रेमासाठी निस्वार्थपणे वीर सावरकर यांनी आयुष्य खर्च केले हे कोणी नाकारू शकत नाही असं हिंदू महासभेतील नेत्यांनी सांगितले.
याआधी सावरकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सावरकरांना अभिवादन केले. सावरकर यांनी अनेकांना राष्ट्र निर्माणासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. वीर सावरकर हे भारतासाठी मजबूत, धाडसी आणि देशभक्तीचं प्रतिक आहे असं मोदींनी सांगितले.
वीर सावरकर यांच्यावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये नेहमी दावे-प्रतिदावे केले जातात. अनेकदा सावरकरांवरुन दोन्ही पक्षात कुरघोडीचं राजकारण केले जाते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही वीर सावरकर यांनी दोन राष्ट्राची संकल्पना आणण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर मोहम्मद जिना यांनी ती संकल्पना स्वीकारली. तसेच सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. मात्र जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजांशी माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली. त्यानंतर जेलमधून सुटल्यावर त्यांनी स्वतंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही या विधानावरुन वाद निर्माण झाला
काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटला होता.