मेरठ : मी नोटाबंदीद्वारे लुटलेले भ्रष्ट लोक आता मला खाली खेचण्यासाठी एकत्र आले आहेत, असा आरोप करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी समाजवादी पार्टी व काँग्रेस यांच्या आघाडीवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणकीच्या घोषणेनंतर मोदींची पहिली जाहीर सभा झाली.अगदी कालपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणारे हे पक्ष आता स्वत:ला वाचविण्यासाठी एकमेकांना आलिंगन देत आहेत, असे ते सपा व काँग्रेसला उद्देशून म्हणाले. राज्याला स्कॅममुक्त (घोटाळेमुक्त) (स्कॅम : एस फॉर समाजवादी पार्टी, सी फॉर काँग्रेस, ए फॉर अखिलेश आणि एम फॉर मायावती) करा, असे आवाहन त्यांनी उत्तरप्रदेशच्या जनतेला केले. एकीकडे भाजपचा विकासाचा अजेंडा आणि दुसरीकडे गुन्हेगारांना आश्रय व जमीन तसेच खाणमाफियांना प्रोत्साहन देणारे यापैकी एकाची तुम्हाला निवड करायची आहे, असे मोदी म्हणाले. तासाभराच्या भाषणात ते भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर विस्ताराने बोलून राज्याचे भवितव्य बदलण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपा सत्तेवर आल्यास राज्यातील शेतकऱ्यांना १४ दिवसांत कर्जमुक्त करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.काँग्रेसने सपा सरकारविरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती आणि अचानक दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली. रात्रीतून असे काय झाले की, ते मांडीला मांडी लावू बसले याचे आश्चर्य वाटते, असा टोला त्यांनी लगावला. जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत ते उत्तर प्रदेशलाही वाचवू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले. भाषणात त्यांनी शेतकरी वर्गाला खूष करण्याचाही प्रयत्न केला. राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर १४ दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. मेरठमधूनच १८५७ मध्ये ब्रिटिशांविरुद्धचे बंड सुरू झाले होते. त्यामुळे दारिद्य्र, भ्रष्ट दले आणि भूमाफियांविरुद्धच्या लढ्यासाठी आपण या ठिकाणाची निवड केली, असे नमूद करून पंतप्रधानांनी नोटाबंदी आणि लक्ष्यभेदी हल्ल्याच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. मला छोट्या लढाईत रस नाही. मी वरच्या पातळीवरील यंत्रणा स्वच्छ करू इच्छितो, असे ते उद्गारले. पक्ष तिकीटे विकून नोटांनी खोल्या भरून ठेवलेल्या लोकांना मी त्यांचे पैसे बँकेत जमा करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग आहे. ते सर्वजण माझ्याविरुद्ध एकजूट होतील हे ठाऊक आहे. (वृत्तसंस्था)मला पंतप्रधान बनविणारे उत्तर प्रदेश हेच राज्य आहे. या राज्याचे माझ्यावर उपकार असून, त्याची मी परतफेड करू इच्छितो. तथापि, त्यासाठी केंद्राच्या हातात हात घालून काम करणारे सरकार राज्यात हवे आहे. - पंतप्रधान
उत्तर प्रदेशामधून ‘स्कॅम’ला दूर करा
By admin | Published: February 05, 2017 1:58 AM