- विकास झाडे
नवी दिल्ली : रस्ते का अडवता? असा सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांना सवाल करीत महामार्ग मोकळे करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड्स हटविण्याचे काम सुरू केले आहे. बॅरिकेड्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत. बॅरिकेट्स हटविल्यानंतर आम्हाला आमचा शेतीमाल थेट संसदेच्या आवारात नेता येईल, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांंनी जाहीर केले.
या आंदोलनात जवळपास ५० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून पोलिसांनी या बॅरिकेट्स लावले होते. त्यानंतर २६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे त्यापुढे तारांचे काटेरी कुंपणही उभारण्यात आले. विविध अडथळ्यांमुळे या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी हाेत होती. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली.
महिन्यांपासून लोक येथील वाहतूक कोंडीमुळे वैतागले होते. शेवटी हा विषय सुप्रीम कोर्टात गेला. पोलिसांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ खुला केला आहे. आदेशानुसारच कारवाई केली जात आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स काढले असले तरीही, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर शेतकरी बसले आहेत. तशीच स्थिती टिकरी सीमेवर आहे. पोलीस आपले आंदोलन उधळू शकतात, म्हणून शेतकरी नेते डॉ. दर्शनपाल यांनी शेतकऱ्यांना सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे.