लखनऊ : दिल्लीतील भीषण हिंसाचाराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कडक पावले उचलत राज्यात जिथे जिथे शेतकरी धरणे धरून बसले होते, तिथून त्यांना बुधवारी रात्री हटविले. त्यासाठी बळाचा वापर न केल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.
उत्तर प्रदेशमधील चिल्ला सीमा, राष्ट्रीय प्रेरणास्थळ, नॉयडातील ग्रीन गार्डन व बागपत येथील बरौत येथे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी काही दिवसांपासून धरणे आंदोलन करत होते. तिथून या आंदोलकांना हटविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भाग पाडणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ते आरोपी सध्या फरारी आहेत.
महामार्गाच्या कामास विलंबाचे कारणबागपतचे उपजिल्हाधिकारी अनिलकुमार सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत आहे, असे पत्र नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) उत्तर प्रदेश सरकारला पाठविले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने कारवाई करत राज्यातील आंदोलन स्थळांवरून शेतकऱ्यांना हटविले, असे सूत्रांनी सांगितले.