वॉशिंग्टन : सोशल मीडिया व मानसिक आरोग्य यांची सांगड नव्या अभ्यासात घालण्यात आली असून, फेसबुक, इन्स्टाग्राम वा टिष्ट्वटर या सोशल वेबसाईटवर दोन तासापेक्षा जास्त वेळ घालविणे मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. सोशल साईटवर प्रमाणापेक्षा जास्त वेळ घालविणाऱ्या मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते, निराशा व आत्मघाताचे विचार प्रभावी होत जातात, असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.या संशोधनातून पालकांना इशारा देण्यात आला असून, या वेबसाईटस्चा वापर अनिर्बंध वापरासाठी न करता, मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी करावा असे संशोधक ह्यू संपासा कानियांगा व रोजमंड ल्युईस यांनी म्हटले आहे. हे दोघेही ओटावा पब्लिक हेल्थ कॅनडा इथे काम करतात. या दोन संशोधकांनी किशोरवयीन मुलांतील सोशल नेटवर्किंगचा वापर व त्यांचे मानसिक आरोग्य यांची तुलना केली आहे. सोशल वेबसाईटवर वेळ घालविणाऱ्या मुलांना मानसिक उपचारांची गरज असते असे त्यांच्या लक्षात आले आहे. सातवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. अंटारिओ स्टुडंट ड्रग यूज अँड हेल्थ सर्व्हे असे या संशोधनाचे नाव आहे. २५ टक्के विद्यार्थी दररोज दोन तासापेक्षा अधिक वेळ सोशल वेबसाईटवर घालवतात. काही जणांना त्यापासून त्रास होतो, तर काही जणांना त्याचा फायदा होतो, असे सॅन दियागो येथील इंटरअॅक्टिव्ह मीडिया इन्स्टिट्यूटच्या ब्रेंडा के विदरहोल्ड यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
सोशल साईटवर जास्त वेळ घालविणे मुलांसाठी धोकादायक
By admin | Published: July 24, 2015 11:21 PM