Akhilesh Yadav News: उत्तराखंडचेमुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक मोठी घोषणा केली. ही घोषणा आहे चार जिल्ह्यातील तब्बल ११ ठिकाणांचे नामांतर करण्याची. मुख्यमंत्री धामी यांच्या या घोषणेबद्दल जेव्हा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, 'उत्तराखंडचे नावच उत्तर प्रदेश २ करून टाका.' हे प्रकरण काय ते समजून घ्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार, डेहरादून, नैनीताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांची नावे बदलणार असल्याची घोषणा केली. लोकांच्या इच्छा आणि भारतीय संस्कृती आणि वारश्यानुसार हे नामांतर केले जात आहे, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशचे नावही जोडा -अखिलेश यादव
अखिलेश यादव या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाले, "उत्तराखंडचे नावही उत्तर प्रदेश २ करून टाका. उत्तराखंडसोबत उत्तर प्रदेशचेही नाव जोडा", अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
उत्तराखंडमधील कोणत्या ठिकाणांचे होणार नामांतर?
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे चार जिल्ह्यातील ११ गावांचे नामांतर केले जाणार आहे. यात हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचे नाव शिवाजी नगर केले जाणार आहे. त्याचबरोबर गाजीवालीचे आर्य नगर, चांदपूरचे ज्योतिबा फुले नगर, मोहम्मदपूर जटचे मोहनपूर जट, खानपूर कुर्सलीचे आंबेडकर नगर, इंदरीशपूरचे नंदपूर, खानपूरचे श्री कृष्णपूर, अकबरपूर फाजलपूरचे विजयनगर करणार आहेत.
हेही वाचा >>महाराष्ट्रातील 'या' गावाचं राज्य सरकार करणार नामांतर! कॅबिनेट मंत्री बावनकुळेंनी केली घोषणा
डेहरादून जिल्ह्यातील मियांवालाचे रामजीवाला, पीरवालाचे केसरी नगर, चांदपूर खूर्दचे पृथ्वीनगर, अब्दुल्ला नगरचे दक्ष नगर असे नामांतर केले जाणार आहे.
नैनिताल जिल्ह्यातील नवाबी रोडचे अटल मार्ग, पाणचक्की ते आयटीआय मार्ग रस्त्याचे नाव गुरू गोळवकर मार्ग, उधमसिंह नगरमधील सुल्तानपूर पंचायतीचे नाव कौशल्यापुरी केले जाणार आहे.