नवी दिल्ली : जीपीएस यंत्रणेद्वारे लवकरच चालत्या ट्रेनमध्ये उपलब्ध जागांचे तपशील, आरक्षण व्यवस्थेत त्वरित अपडेट करण्याचा प्रयोग रेल्वेने कार्यान्वित केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून चालत्या ट्रेनमधे ऐनवेळी हक्काचे आरक्षण मिळण्याची सुविधा त्यामुळे उपलब्ध होणार आहे. या पायलट प्रकल्पाच्या संचलनाला देशातल्या प्रमुख ट्रेन्समधे प्रारंभ होत आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळाली. चालत्या ट्रेनमधे बर्थ अथवा सीट मिळवण्यासाठी आजवर टीटीई (ट्रॅव्हलिंग टिकिट एक्झामिनर)कडे याचना करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. प्रवाशांना जागा मिळवून देताना अनेक टीटीई मनमानी वसुली करतात. आता रेल्वेतली ही खंडणी वसुली बंद होईल, कारण रेल्वे प्रशासन टीटीईच्या हाती जीपीएस यंत्रणेचे मशीन सोपवणार आहे. या मशीनवर ट्रेनमधील उपलब्ध जागांचा तक्ता ताज्या माहितीसह उपलब्ध असेल. रेल्वेचे जे प्रवासी आपला नियोजित प्रवास ऐनवेळी रद्द करतात, त्या जागांची त्वरित माहिती मिळण्याचे कोणतेही तंत्र आजतागायत उपलब्ध नव्हते. ट्रेन सुटल्यावर टीटीईने कोणावर मेहरबानी(!) केली नाही, तर बऱ्याचदा अशा जागा रिकाम्या राहत असत. आता रिकाम्या जागांचा तपशील टीटीईला लगेच जीपीएसवर अपडेट करावा लागेल. चालत्या ट्रेनच्या अशा रिकाम्या जागांचा ताजा तक्ता तमाम आरक्षण केंद्रे तसेच इंटरनेटवरही उपलब्ध होईल.(विशेष प्रतिनिधी)
रिकाम्या जागांवर चालत्या ट्रेनमध्ये ऐनवेळी आरक्षण
By admin | Published: November 20, 2015 3:38 AM