हरीश गुप्तानवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येचुरी यांनी पुढाकार घेतला आहे. जानेवारीत ते यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राहुल गांधी व काँग्रेस नेतृत्वासह अन्य नेत्यांशीही ते यासंदर्भात बोलणार आहेत.
‘लोकमत’शी बोलताना सीताराम येचुरी यांनी सांगितले की, माझ्या निमंत्रणावरून शरद पवार मागच्या आठवड्यात चर्चेसाठी दिल्लीला आले होते. विरोधी पक्षांचे नेतृत्व शरद पवार यांंनी करावे, ही कल्पना तुमचीच होती का? असे विचारले असता येचुरी म्हणाले की, मूळ मुद्दा म्हणजे विरोधक मजबूत होणे जरुरी आहे. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसमध्ये काही उणिवा जरूर आहेत. तथापि, भारतीय राज्यघटना कमकुवत होऊ दिली जाणार नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांचा अनुभवही मोलाचा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, हाच आजघडीचा मुद्दा आहे.