हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून भाजपला मोठा हादरा दिला. दिल्लीत सत्तेचा जवळपास २२ वर्षे दुष्काळ सोसावा लागणे भाजपसाठी हे खूप वेदनादायी आहे. सत्तेचा सोपान चढण्यासाठी १९९८ पासून सलग राजकीय डावपेच आखूनही भाजपसाठी ‘दिल्ली दूर’ ठरली.गेल्या निवडणुकीत डॉ. हर्षवर्धन यांना डावलून भाजपने माजी आयपीएस किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून आयात केले होते. तथापि, त्यांचा पराभव तर झालाच, सोबतच ७० जागांपैकी भाजपच्या पदरात जेमतेम तीनच जागा पडल्या. यावेळी केजरीवाल यांच्याविरुद्ध भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कोणत्याही नेत्याला पुढे न करण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्तिश: प्रचाराची धुरा वाहिली. शाहीनबागेतील महिलांचे धरणे आंदोलन व दिल्लीत हिंदूंच्या भावना जागृत करण्याचा भाजपने जाणीवपूर्वक निर्णय घेतला. प्रचाराची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांनी निवडणूक संग्रामाला नवीन कलाटणी देण्याच्या आशेने व भाजपला अनुकूल मतप्रवाह तयार करण्यासाठी वस्तीत व्यक्तिश: पत्रके वाटली.अरविंद केजरीवाल यांनी विकासावर लक्ष केंद्रित केले. ते शाहीनबागेपासून अलिप्त राहिले. पंतप्रधान मोदी किंवा शहा यांच्यावर त्यांनी एका शब्दानेही टीका केली नाही. ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला आणि हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेऊ न मीही तुमच्यापैकीच असल्याचा राष्टÑवाद्यांना आणि हिंदूंना संदेश दिला.केजरीवाल यांनी वृत्तवाहिन्यांमार्फत दिल्लीकरांशी संवाद साधताना राष्टÑीय मुद्द्यांना कटाक्षाने टाळले. निवडणुकीच्या आघाडीवर काँग्रेस दिसत नसल्याने मुस्लीम समुदायानेही केजरीवाल यांच्याकडे आपले कैवारी म्हणून पाहिले.दिल्ली निवडणुकीतून द्विपक्षीय पद्धतीत काँग्रेस पूर्णत: प्रभावहीन ठरल्याचे अधोरेखित झाले. काँग्रेसकडे रणनीती नव्हती. राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर आक्रमक निशाणा साधला. परंतु, दुसरीकडे भाजपने काँग्रेसवर सातत्याने प्रखर टीका करण्याची मोठी चूक केली. त्यामुळे काँग्रेसचे मतदार आपकडे वळले आणि केजरीवाल यांची बाजू भक्कम होत गेली.
Delhi Election: विरोधकांना नवचैतन्य ही भाजपसाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 6:31 AM