अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रख्यात भरतनाट्यम डान्सर अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अमरनाथ घोष हे त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होते. ही घटना अमेरिकेतील मिसोरीमधील सेंट लुईस येथे घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांना बेछूट गोळीबार करत अमरनाथ घोष यांना लक्ष्य केले. या हल्ल्याच्या घटनेनंतर आशियाई वंशाच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमरनाथ घोष यांच्या हत्येची माहिती त्यांची मैत्रिण आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने दिली आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये देवोलिना भट्टाचार्जी हिने लिहिले की, अमरनाथ घोष याची मागच्या मंगळवारी हत्या करण्यात आली. असं वाटतंय की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच आरोपींची ओळखही पटलेली नाही. या घटनेनंतर न्याय मागण्यासाठी पीडिताची जवळची कुणी व्यक्ती तिथे उपस्थित नसल्याने कदाचित पोलिसही फार लक्ष देत नाही आहेत. आता भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे.
अमेरिकेत द्वेषाच्या गोळीची शिकार झालेले अमरनाथ घोष हे कोलकाता येथील रहिवासी होते. ते चेन्नईमध्ये आर्ट टीचर म्हणून काम पाहत होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे कोलकाता येथे झालं होतं. तसेच ते एक प्रसिद्ध भरतनाट्यमन डान्सरही होते. त्यांनी पीएचडीही केली होती. दरम्यान, देवोलिना भट्टाचार्जीने सांगितलं की, अमेरिकेतील त्यांचे काही मित्र अमरनाथ घोष यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता यावेत म्हणून मृतदेहावर दावा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. यादरम्यान शिकागोमधील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने घोष यांचे नातेवाई आणि मित्र आपेष्टांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच पोलिसांकडून तपासाबाबत अपडेट मिळवत आहोत, असेही त्यांनी सांगितले.