श्रीनगर : काश्मीरमध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत आतापर्यंत तब्बल ५० हजार कोटी रुपयांची जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून, आता तिचे संबंधित विभागांकडे हस्तांतरण सुरू आहे. यात ८७ हजार एकर सरकारी जमीन शासकीय कार्यालयांच्या ताब्यात देण्यात आली आहे. एका माजी आमदाराने सरकारी जमीन बळकावून चक्क लष्कराकडूनच भाडे वसूल केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
अनंतनागमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार अल्ताफ कालू यांनी सरकारी जमिनीवर कब्जा करून लष्कराकडून भाडे वसूल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता प्रशासनाकडून तपास पूर्ण झाल्यानंतर कालूंकडून अवैध भाडे वसूल करण्यात येणार आहे. श्रीनगरमध्ये सरकारी जमिनीवर चक्क हॉटेल्स उभारण्यात आली होती. त्या हाॅटेल्सला सील ठाेकले आहे. (वृत्तसंस्था)
दिग्गजांवर कारवाईयापूर्वीच्या अतिक्रमण हटाव मोहिमा म्हणजे कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होता. प्रशासन अतिक्रमण हटवून शासकीय फलक, आदी लावून निघून जाई आणि त्यानंतर अतिक्रमणधारक संबंधित जागांवर पुन्हा ठाण मांडत. यावेळी प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांना अजिबात अशी संधी देत नाही. या मोहिमेत सामान्य नागरिकांऐवजी दिग्गजांवर कडक कारवाई केली जात आहे.